पिंपरी : घरफाेडी करणा-या एका आराेपीला टी-शर्टच्या आधारे ओळखून म्हाळुंगे पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १८ लाख रूपये किंमतीचे २६ ताेळे साेन्याचे दागिने जप्त केले.टुल्लू कुमार रामू राऊत (वय २५, रा. पवार वस्ती चिखली, मुळ, बिहार) आणि त्याच्याकडून दागिने खरेदी करणा-या बालेश्वर प्रसाद नंदलाल साह (वय ४५, रा. माेतीहरी बिहार) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. याबाबत अरविंद प्रकाश कसाळे यांनी म्हाळुंगे पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२४ राेजी कसाळे यांच्या घरी चाेरी झाली हाेती. घराचा कडी-काेयंडा ताेडून कपाटातील २६ ताेळे साेन्याचे दागिने चाेरट्यानी लांबविले होते. पाेलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ ताब्यात घेतले हाेते. त्यात टुल्लूकुमार हा कसाळे यांच्या घराच्या परिसरात संशयितरित्या वावरताना दिसला. त्याची टी-शर्ट घालण्याची आणि चालण्याची एक पद्धत हाेती. त्यावरून पाेलिसांनी टुल्लूकुमारला ताब्यात घेतले. त्याने चाैकशीत गुन्ह्याची कबुली दिली. चाेरलेले दागिने मुळगावी बिहारला आराेपी बालेश्वरला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार बिहार येथील नेपाळ सिमेवरील दुर्गम ठिकाणी जावून पाेलिसांनी बालेश्वरलाही अटक केली.