२०१४ पूर्वी गुजरात आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घोषित होत होत्या. मात्र, २०१२ नंतर हिमाचल प्रदेशची आधी नंतर गुजरातची निवडणूक लागत आहे. या काळात अनेक घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येतात. यावेळी केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले, असा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्रातील करार झालेले प्रकल्प पळवण्यात आले. नंतर सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातीसाठी जाहीर केले. यातील अनेक प्रकल्प अगोदरच येणार होते. मात्र, दोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही,” असेही अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा : “शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने…”; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याला दुजोरा देत अरविंद सावंत यांनी सांगितलं की, “राज्यात प्रकल्पांची घोषणा होते, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका लागतील, असा उद्धव ठाकरेंना अंदाज आहे. गुजरातमध्ये पाडलेला पायंडा महाराष्ट्रात पाडू इच्छितात,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.