सांगली : वीजेच्या कडकडाटासह मिरज आणि परिसरात हस्त नक्षत्रांच्या पावसाने धुमाकूळ घातला. मध्यरात्री साडेबारापर्यंत सुरू असलेल्या पावसाने अनेक ताली फुटल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून मिरज व मालगावमध्ये अडीच तासांत तब्बल ७१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी पावसाची लक्षणे होती. मात्र, रात्री नउनंतर पूर्वेकडील वारे आणि वीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री दहानंतर पावसाचा जोर वाढला. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता.
हस्त नक्षत्राच्या पावसाने मालगाव परिसरात अनेक ताली फुटल्या आहेत. रात्री पाउस झाल्याने नागरिकांची फारशी तारांबळ उडाली नसली तरी शहरात सखल भागातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यावर दोन फुटांनी पाणी वाहत होते. रात्री उशिरापर्यंत सांगली व मिरज शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरात आज पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात आला.

हे ही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ

पावसामुळे तालीत पाणी साचल्याने पेरणी केलेल्या शाळू पेरणीवर पाण्याचा दडपा बसला असल्याने उगवण होण्याबाबत साशंकता असून दुबार पेरणीचे संकट आहे. तसेच काढणीला आलेल्या सोयाबीन, भुईमूग पिकामध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. रानाला पाझर फुटल्याने दिवाळीपर्यंत रब्बीची पेरणी अशयय आहे.

हे ही वाचा…पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू, याआधीही मुळशीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं…

काल रात्री जिल्ह्यात सरासरी ११.१ मिलीमीटर पाउस झाला असला तरी मिरज, पलूस, वाळवा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त होते. तालुकानिहाय झालेला पाउस असा मिरज ३४.१, जत ०.२, खानापूर १.९, वाळवा १९.६, तासगाव १.९, शिराळा ०.९, आटपाडी ०.३, कवठेमहांकाळ निरंक, पलूस १४.२ आणि कडेगाव ११.३ मिलीमीटर.