सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर परिसरात गुरुवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने याबाबत दिलेल्या माहितीनुसार २.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू सांगोला भागात असून भूकंपाची खोली पाच किलोमीटरपर्यंत होती, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने अधिकृतपणे जाहीर केले आहे. सांगोला भागासह लगतच्या मंगळवेढा, पंढरपूर तसेच माणदेश पट्ट्यात जत तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मात्र त्याची तीव्रता कमी होती. मात्र काही गावांमध्ये घरांचे दरवाजे आणि खिडक्यांची तावदाने थरथरल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे १ एप्रिल रोजी सकाळी ११ आणि दुपारी सव्वादोन वाजता अशा दोन वेळा भूगर्भातून गूढ आवाज आला होता. त्यावेळी अनेक जण घाबरून घराबाहेर पडले होते. याअगोदरही गेल्या दोन तीन वर्षांपासून सांगोला तालुक्यात अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज ऐकायला मिळत होते. परंतु त्याचे नेमके कारण स्पष्ट होत नव्हते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सांगोला व आसपासच्या भागात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने भूगर्भातील गूढ आवाजाचे कारण भूकंपच असल्याचे बोलले जाते.

मराठवाड्यातील किल्लारी व सास्तूर भागात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाच्या अगोदर काही महिने भूगर्भातून गूढ आवाज येत होते.

अवकाळी पावसाची हजेरी

वाढत्या उन्हामुळे तापलेल्या सोलापुरात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट होत नागरिकांना दिलासा मिळाला. या पावासामुळे ४१ अंशांपेक्षा अधिक वाढलेले तापमान आता ३८ अंशांपर्यंत खाली उतरले आहे.

गुरुवारी दुपारीपासून आकाशात ढगांची गर्दी होऊन सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.४० वाजेनंतर अवकाळी पावसाचे थेंब पडू लागले. नंतर मध्यम सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात बदल झाला. काही भागात वारे खेळत राहिल्याने सोलापूरकर सुखावले. मागील दहा दिवसांत सोलापुरात तापमानाचा पारा ४०-४१ अशांवर होता. काल बुधवारी मात्र त्यात बदल होऊन तापमान ३ अंशांनी घटले आणि ३८ अशांवर स्थिरावले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी तापमान ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.