मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू करणारे चांगली लोक हवे आहे. खासदार होऊन मी शिवसेनेसाठी चांगलं काम करू शकतो, असं विधान माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केलं. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर देवरांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मिलिंद देवरा म्हणाले, “मी खूप भावनिक आहे. मी काँग्रेस सोडेन कधी वाटलं नव्हतं. काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षे असलेले नाते मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांनी सेवा करणं आहे. मुख्यमंत्री शिंदे मेहनती असून सर्वांसाठी उपलब्ध असतात. म्हणून त्यांचे हात आणखी बळकट करायचे आहेत. तसेच, शिवसेनेच्या माध्यमातून यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात बळकट करायचे आहेत.”
हेही वाचा : मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला? काय आहे राजकीय गणित?
“पूर्वीच्या आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिकवलं की, राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा ही एक विचारधारा आहे. १९६८ साली माझे वडील मुरली देवरा तर २००४ साली मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, तेव्हाच्या आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक आणि गुणवत्तेच्या आधारावरील राजकारणाला महत्व दिलं असतं, तर मला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसावं लागलं नसतं,” अशी टीका मिलिंद देवरांनी केली आहे.
“…हेच काँग्रेसचं काम आहे”
“पंतप्रधान जे बोलतात, जे कर्म करतात त्याविरोधात बोलणं, हेच काँग्रेसचं काम आहे. काँग्रेस चांगला पक्ष आहे, असं मोदींनी म्हटलं, तर त्यालाही काँग्रेसवाले विरोध करू शकतात,” असं टीकास्र मिलिंद देवरांनी डागलं.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात, मिलिंद देवरा यांच्यानंतर कोण ?
“मोदी आणि शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई आणि भारत अधिक सुरक्षित”
“मुंबईच्या अर्थव्यवस्था वाढीसाठी आणि मजबूत करण्यासाठी काम करू. त्यातून सामान्य नागरिकांना रोजगार मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देश मजबूत होत आहे. तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्राला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. मोदी आणि शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई आणि भारत अधिक सुरक्षित आहे,” असं देवरांनी सांगितलं.