स्वत:ला कार्यसम्राट म्हणून संबोधून घेणारे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक उमेश शेटय़े हे खऱ्या अर्थाने अनधिकृत व बेकायदा बांधकामाचे जनक आहेत, असा सणसणीत आरोप मावळते नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी करतानाच शहराच्या तेली आळीतील वाहतुकीला अडथळा ठरणारा पिंपळाचा पार नगर परिषदेने हटविल्यामुळेच हा ‘मुंजा’ आपल्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत आहे, अशी टीका कीर यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, नगरपालिकेच्या कायद्याचे ज्ञान नसलेले मावळते नगराध्यक्ष मिलिंद कीर हे मे. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनच्या ताटाखालचे मांजर आहेत, अशी टीका करून शिवसेना नगरसेवक उमेश शेटय़े यांनी, बोक्याने कितीही नखे वाढवली तरी तो वाघ होऊ शकत नाही. शहराची बकाल अवस्था पाहता कीर हे आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी नगराध्यक्ष असल्याचा टोलाही हाणला.
चार दिवसांपूर्वी मावळते नगराध्यक्ष कीर यांनी आपल्या सव्वा वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांची तसेच विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर व अभिजीत गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मिलिंद कीर हे चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार घेण्यासाठी कीर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंदरकर यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे सूतोवाच करतानाच तेली आळीतील वाहतुकीला अडथळा ठरणारा सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वीचा जुना पिंपळपार नगर परिषदेने हटविल्यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘त्या’ पारावरील मुंज्याने हे कारस्थान रचल्याचे सांगितले. परंतु तो मुंजा कोण, हे मात्र कीर यांनी त्यावेळी स्पष्ट केले नव्हते.
त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक व जिल्हा प्रवक्ता उमेश शेटय़े यांनी गुरुवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मावळते नगराध्यक्ष कीर हे सामंत कन्स्ट्रक्शनच्या ताटाखालचे मांजर आहेत, पण बोक्याने कितीही नखे वाढवली तरी तो वाघ होऊ शकत नाही. तसेच त्यांना नगरपालिका कायद्याचे ज्ञानही नाही, अशी टीका केली होती.
शेटय़े यांच्या त्या विधानाचा कीर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला. स्वत:ला कार्यसम्राट म्हणून संबोधून घेणारे उमेश शेटय़े हे खऱ्या अर्थाने अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामांचे जनक आहेत. ते राहात असलेल्या तेली आळी- आठवडा बाजार परिसरात लहान-मोठी अनेक बांधकामे अनधिकृत आहेत. ती हटविण्याबाबत न.प.ने मोहीम हाती घेतली आहे. तसेच याच भागात असलेला जुना पिंपळपार वाहतुकीला अडथळा ठरल्याने तो गेल्या महिन्यातच जमीनदोस्त करण्यात आला आहे. पण त्यामुळे हा पिंपळपारावरील उमेश शेटय़े नामक मुंजा अस्वस्थ झाला असून, तो राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहे, असे मिलिंद कीर यांनी सांगितले.
ऐन शिमगोत्सवाच्या तोंडावर शिवसेनेच्याच दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याने रत्नागिरीकरांची चांगलीच करमणूक होत आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक जिल्हा नेतृत्व याबाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याने सामान्य शिवसैनिक हवालदिल झाल्याचे दिसून येते.

Story img Loader