शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील शिवसैनिक आणि नेतेमंडळी आपल्या सोईनुसार उद्धव ठाकरे किंवा शिंदे गटात सामील होत आहेत. मागील काही दिवसांपासून सध्या उद्धव ठाकरे गटातील नेते मिलिंद नार्वेकर नाराज असल्याचा दावा केला जातोय. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील काल याच आशयाचे विधान केले होते. महाजनांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, नार्वेकर नाराज असल्याचा दावा केला जात असतानाच त्यांनी आज (२३ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा >> सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…”

नार्वेकर नाराज असल्याचे म्हटले जात असतानाच आज त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशन (एमसीए) निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. या भेटीच्या माध्यमातून मी नाराज नसल्याचा संदेश देण्याच्या प्रयत्न नार्वेकर यांचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मातोश्रीवर जात नार्वेकरांनी ही भेट घेतली आहे. तसे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर दिसत आहेत.

हेही वाचा >> एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची ठाकरेंवर टीका? आता किशोरी पेडणेकर यांचेही जशास तसे उत्तर; म्हणाल्या…

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

“अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात काहीही गैर नाही. ते देशाचे गृहमंत्री आहेत. मोठे नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर असायचे. याच कारणामुळे अमित शाह आणि नार्वेकर यांची चांगली ओळख आहे. मिलिंद नार्वेकर आणि माझी मागील काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भेट झालेली नाही. मात्र चर्चा सुरू आहे की ते नाराज आहेत,” असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच शिवसेना पक्षात (उद्धव ठाकरे गट) कोण राहील, त्यांची साथ कोण सोडेल हे सांगता येत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले होते.

हेही वाचा >> दीपाली सय्यद नाराज आहेत? शिंदे गटात जाणार का? दिली सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणाल्या “माझी कोणावरही…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आक्रमक नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील धुळ्यातील एका सभेत लवकरच मिलिंद नार्वेकर आमच्या गटात येणार आहेत, असे विधान केले होते. गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर मिलिंद नार्वेकर यांच्याकडून काहीही उत्तर न आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते.