रत्नागिरी : रत्नागिरी शहरात परिसरात होणारी दुधाची भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलली असून शहर भागात दुध भेसळ करणाऱ्या आठ ते दहा जणांच्या टोळक्यावर कारवाई करण्यात आली आहे. यातील एका स्थानिक दूध विक्रेत्याला १६ हजाराचा दंड देखील आकारण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने दूध संकलन आणि वितरण यावर होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन दूध व्यवसाया करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यात आली होती. शहरातील मारूती मंदिर व परटवणे यासारख्या अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी येणारे दूध आणि होणारे वितरण याचे व्हिडीओ रेकॉडींग करत दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यश आले आहे. ही दूध भेसळ करत असताना रत्नागिरी जिल्ह्याचे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी टोळक्याला रंगेहाथ पकडले.

ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरात ८ ते १० जणांचे टोळके सकाळी दूधाच्या किटल्या घेऊन संबंधित ठिकाणी येऊन एखाद्या टपरीवर किंवा झाडाच्या बाजूला घाटमाथ्यावरून येणारे गायीचे दूध घेऊन त्यामध्ये भेसळ करत असल्याचे उघडकीस आले. हे दूध शहरातील नागरिकांना म्हैशीचे दूध म्हणून वितरीत करत होते. मात्र वितरण करताना हे दूध थंड असल्याचा ग्राहकांना संशय येत होता. परंतु याबाबत गुप्त माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी स्वतः यावर लक्ष देवून दूध भेसळ करणाऱ्यांच्या टोळीवर कारवाई केली. या प्रकरणात स्थानिक दूध विक्रेत्यांचा देखील हात असल्याने एका स्थानिक दूध विक्रेत्याला सोळा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

Story img Loader