दुधाच्या दरासह विविध मागण्यांसंदर्भात राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीने बुधवारी निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून दिले, तसेच कांदाही येथे टाकून देण्यात आला.
कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. सुभाष लांडे, बाळासाहेब पटारे, कॉ. शांताराम वाळुंज, कॉ. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात दुधाचा भाव सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात सतत घसरण सुरू असून, गायीच्या दुधासाठी प्रतिलीटरला २६ रुपये उत्पादन खर्च येतो, त्याची विक्री मात्र १६ रुपयांनी सुरू असून उत्पादकांना प्रतिलीटर १० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चच भागत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे. या भावातून ओला व सुका चारा, पशुखाद्य, औषधोपचाराचाही खर्च भागत नाही. जिल्हय़ात अकोले येथे विविध संघटनांनी आयोजित केलेल्या दूध परिषदेत किफायतशीर भावासाठी संघर्षांचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी विद्यापीठाच्या अभ्यास गटाच्या अहवालानुसार गायीच्या दुधाला प्रतिलीटर २६ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतिलीटर ३९ रुपये खर्च येतो. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार ५० टक्के नफा गृहीत धरून गायीच्या दुधाला ३९ रुपये व म्हशीच्या दुधाला ५ रुपये प्रतिलीटर भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात १६ रुपयेच दूध उत्पादकाच्या हातात पडत आहेत. त्यामुळेच शेतकरी व दूध व्यवसायही पूर्णपणे अडचणीत आला असून, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दुधाला तातडीने किफायतशीर भाव मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Story img Loader