पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दूध उत्पादनात मोठी तूट येऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ होते. मात्र, यंदा दूध उत्पादनात फारशी तूट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेअरी उद्योगाचे अभ्यासक आणि कुतवळ फूड्स प्रा. लि.चे प्रकाश कुतवळ म्हणाले, उन्हाळ्यात दुधाला चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकरी सजग झाले आहेत. ओला, सुका चारा, पाणी, पशूखाद्यांचे शेतकरी योग्य नियोजन करू लागले आहेत. तापमान, आर्द्रता नियंत्रणात ठेवता येतील, असे अद्ययावत गोठे उभारले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील दूध उत्पादन आणि उन्हाळ्यातील दूध उत्पादनात यापूर्वी दिसून येणारी तूट कमी झाली आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजीनामा का दिला हे समोर आले पाहिजे; जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राज्यात सध्या दररोज सरासरी १ कोटी १० लाख लीटर दूध संकलन होते. त्यात म्हशीच्या दुधाचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत आहे. १५ फेब्रुवारी ते १५ जून हा काळ दुग्ध व्यवसायातील तेजीचा काळ असतो. उन्हाळ्यामुळे दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड आणि सुंगधी दुधाला मागणी वाढते. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात दरवर्षी वाढ होत होती. पण, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यातील आणि उन्हाळ्यातील दूध उत्पादनात फारसा चढ-उतार होताना दिसत नाही. फार तर पाच ते दहा टक्के चढ-उतार जाणवतो, असेही कुतवळ म्हणाले.

म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ

मागील काही वर्षांपासून गायीच्या दूध दरात मोठा चढ-उतार दिसून येत आहे. सध्या गायीच्या दुधाला शेतकऱ्यांना २५ ते २७ रुपये दर मिळत आहे. त्या तुलनेत म्हशीच्या ६.० स्निग्धांश असलेल्या दुधाला ५० रुपये प्रति लीटर दर मिळत आहे. संकरीत गायी सातत्याने आजारी पडतात. त्याचा चारा-पाणी आणि औषधांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. त्या तुलनेत म्हशींचा दूध उत्पादन खर्च कमी आहे. आजवर प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली परिसरात म्हशीचे दूध उत्पादन जास्त होत होते. आता नगरसारख्या गायीच्या दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यातही म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> सत्तेतील काही नेत्यांच्या गैरव्यवहाराच्या फाईल्स माझ्याकडे; रोहित पवार यांचा इशारा

प्रक्रियेसाठी मुबलक दूध

उन्हाळ्यात दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असली तरीही दरवाढ होण्याची शक्यता नाही. जागतिक बाजारात दूध पावडर आणि चीझचे दर पडलेले आहेत. त्यामुळे प्रक्रियेसाठी दुधाची उपलब्धता चांगली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात दूध खरेदीसह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती कात्रज दूधचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk prices likely to remain stable during this summer pune print news dbj 20 zws