विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या चर्चेपलीकडे जात वाशीम जिल्ह्यातील बाळखेडच्या शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने बीजोत्पादनाच्या माध्यमातून स्वसमृद्धीचा मार्ग प्रशस्त केला आहे. वर्षांला १ कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल करणाऱ्या या व्यवसायातून गावाचे अर्थकारण बदलून गेले आहे. गावकऱ्यांनी दुग्धोत्पादनाचे नवे दालन खुले केलेच, शिवाय सूतनिर्मिती उद्योग उभारणीचाही त्यांचा मानस आहे.
रिसोड तालुक्यातील बाळखेडची ओळख आता बियाणे तयार करणारे गाव म्हणून झाली आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे बीजारोपण झाले होते. तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवा शेतकरी संतोष अवताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून श्री बाळनाथ शेतकरी कृषिविज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली. ग्रामबीजोत्पादन उपक्रमावर भर देऊन पहिल्या वर्षी २०० शेतकऱ्यांचे मिळून प्रत्येकी २० गट तयार करण्यात आले. कृषी विभागाकडून हरभऱ्याचे ‘जॅकी ९२१८’ वाणाचे पायाभूत बियाणे देण्यात आले. २०० एकरावर हरभऱ्याचे बीजोत्पादन घेण्यात आले. मात्र, त्यावर प्रक्रियेची गरज होती. गावापासून  तीस किमी अंतरावरील मालेगावमध्ये तशी सोय होती. पण त्यामुळे वाहतूक खर्चाचा भरुदड बसला असता. म्हणून मग मंडळातील प्रत्येक सदस्याने ४० हजार रुपये जमा केले आणि स्पर्धाक्षम प्रकल्पातून मिळालेल्या दोन लाख रुपयांच्या अनुदानातून ९ लाख रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम असल्याने बाळनाथ शेतकरी मंडळाने केवळ नफा कमावण्याचे उद्दिष्ट ठेवले नाही. बीजोत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाकडून हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे वितरण अनुदान मिळते. त्याचा फायदा या शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांनी बीजोत्पादन न करता फक्त हरभरा विकला असता तर बाजारभावाप्रमाणे त्यांना दर मिळाला असता, पण बीजोत्पादनातून दुप्पट किंमत मिळाली. यातून नफ्याचे प्रमाण वाढले.
आज बाळखेडचे शेतकरी सोयाबीनचेही बीजोत्पादन घेत आहेत.
 गावकऱ्यांनी दुग्धोत्पादनही सुरू केले आहे. ८० जाफ्राबादी म्हशी आणि संकरित गाईंच्या बळावर २५ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. आधी केवळ ५० लिटर दुधाचे उत्पादन करणाऱ्या गावात आज ७०० लिटर दूध दररोज मिळते. आरएडीपी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झालीच होती. आता गावकऱ्यांनी स्वयंपूर्णतेचा ध्यास बाळगला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावातील शेतकऱ्यांना योग्य मार्ग गवसला आहे. बीजोत्पादनातून अर्थकारण सुधारले आहे. त्याला आता दुग्धोत्पादनाची जोड मिळाली आहे. गावाची सुधारणा झाली आहे. कृषिविज्ञान मंडळात सर्व जाती-पंथ व सर्व पक्षांचेही लोक आहेत. आता सूतनिर्मिती उद्योग उभारणीचा प्रयत्न आहेत
– संतोष अवताडे,
श्री बाळनाथ शेतकरी कृषिविज्ञान मंडळाचे अध्यक्ष

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millenaire village become by selling seeds