राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत असताना आता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, राहुल गांधींना उघड आव्हान देतानाच त्यांनी २०२४मधील शिवसेनेच्या भूमिकेविषयी देखील भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का?

असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारवर आणि आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. “थ्री इन वन आहे की टू इन वन आहे काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांना? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का?” असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

“राहुल गांधींमध्ये हिंमत आहे का?”

यावेळी बोलताना ओवैसींनी राहुल गांधींना उघड आव्हान दिलं आहे. “काँग्रेसला विचारा, त्यांचे माजी अध्यक्ष हिंदुत्वाविषयी फार बोलत असतात. महाराष्ट्रात काय होतंय त्याविषयी त्यांनी बोलावं. यावर बोलायची हिंमत आहे का राहुल गांधींची? सांगा एनसीपीवाल्यांना यावर बोलायला. आम्ही निवडणूक लढवायला लागलो तर म्हणता मतांची विभागणी करतोय. आम्ही मागणी केली तर जातीयवादी म्हणता. तुम्ही तर शिवसेनेला सत्ता दिली. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देऊ शकता. तुम्ही काय ठेका घेतलाय का धर्मनिरपेक्षतेचा?” असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.

२०२४च्या निवडणुकांविषयी भाकित!

राज्यात पुढील विधानसभा निवडणुका २ वर्षांनंतर अर्थात २०२४मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये देखील महाविकासआघाडी एकत्र असणार का? याविषयी बरीच चर्चा आणि अंदाज सध्या सुरू आहेत. त्याविषयी आता ओवैसींनी भाकित वर्तवलं आहे. “२०२४पर्यंत तुम्ही बघा, शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल”, असं ओवैसी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim asaduddin owaisi on shivsena congress ncp secularism rahul gandhi pmw