येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रात बाबरी पाडण्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे चालू असताना दुसरीकडे एमआयएमचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाबरी पडली त्यावेळी आपण तिथे हजर होतो आणि तो आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता ओवेसींनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी नेमकी कुणी काय भूमिका घेतली होती? यावर सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाकडून बाबरी पाडली त्या दिवशी शिवसेना तिथे नव्हती असा दावा करण्यात येत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीह यासंदर्भात विधान केलं असून त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर ओवेसींनी एएनआयशी बोलताना टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ६ डिसेंबरला बाबरी पाडली तेव्हा ते तिथे होते आणि तो दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता. तुम्ही एका घटनात्मक पदावर आहात. उपमुख्यमंत्री आहात. राज्यघटनेवर तुम्ही शपथ घेतली आहे. आणि तुम्ही म्हणताय बाबरी पाडली हे खूप चांगलं काम झालं. तुम्ही हे भडकवण्याचं काम करत नाहीयेत का? उपमुख्यमंत्री असून तुम्ही ही असली निरर्थक भाषा करत आहात. जर तुम्हाला आता एवढी हिंमत आली असेल, तर मग न्यायालयात जाऊन तुम्ही मान्य करायला हवं होतं की तुम्ही मशीद तोडली. तुम्ही घाबरून तसं सांगितलं नाही. त्यामुळे त्या प्रकरणात कुणाला शिक्षा झाली नाही”, असं ओवेसी म्हणाले.
ठाकरे गटालाही केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. बाबरी पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक होती, असा दावा संजय राऊतांकडून सातत्याने केला जात आहे. यासंदर्भात त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओही असून त्यात बाबरी पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक होते ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणताना दिसत आहेत. त्यावर आता ओवेसींनी हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
“आत्ता शिवसेनेचे लोकही पुढे येऊन बाबरीविषयी दावे करत आहेत. पण मग न्यायालयात जाऊन तुमच्या गुन्ह्यांची कबुली द्या ना. तुरुंगात जायला तुम्ही घाबरत का आहात? मोदी सरकारनं त्या निकालाविरोधात अपीलच केलं नाही. एकनाथ शिंदे म्हणतात गेल्या २००-३०० वर्षापासून अस्तित्वात असणारा एक दर्गा आम्ही हटवून टाकू. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्या नजरेत सगळे सारखेच असायला हवेत. मग तो कोणत्याही धर्माचा असो. पण तुम्ही एका समाजाबाबत अशा निरर्थक गोष्टी बोलत आहात”, अशा शब्दांत ओवेसींनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.
“बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यामुळेच हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांची हिंमत वाढलीये. त्यामुळेच हे अशा प्रकारच्या भावना भडकवणाऱ्या गोष्टी बोलत आहेत”, असंही ओवेसी यावेळी म्हणाल्या.