वांद्रे येथील पराभवानंतर औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ता आली तर दलितांना अडीच वर्ष महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊ, असे एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी जाहीर केले. औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत पोलिसांनी दिलेल्या नोटिसीवरुन उपस्थित जनसमुदायाला भावनिक साद त्यांनी घातली. मृत्यू आलाच तर या आलमगिराच्या गावी यावा, कारण येथल्या लोकांनी मला तेवढे प्रेम दिले आहे, असे सांगत ओवेसी यांनी एकजुटीचे आवाहन केले.
दलित आणि मुस्लीम मतांची ध्रुवीकरण व्हावे अशा पद्धतीने त्यांनी केलेल्या भाषणात शहरातील समस्यांचाही ऊहापोह केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकारच काढून घ्यावा असे वक्तव्य केले होते. नंतर त्यांनी घूमजावही केले, त्या पाश्र्वभूमीवर ओवीसी म्हणाले, घटना तुमच्या नेत्यापेक्षाही मोठी असते. काश्मीरमध्ये परमुलखातला झेंडा फडकवला जातो, तेव्हा तुम्ही काय करत असता, नुसतेच अग्रलेख लिहिता का, अशी बोचरी टीकाही त्यांनी राऊत यांच्यावर केली.