औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यास एमआयएमचा विरोध असेल. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर व्हावा, असे आम्ही प्रयत्न करू, असे सांगत शिवसेनेने आत्मचिंतन करावे, असा सल्ला आमदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला. लोक तुमच्यापासून दूर का गेले आहेत, हे एकदा तपासून बघा असे सांगत त्यांनी नागरी प्रश्नांवरून शिवसेनेला सभागृहात अडचणीत आणण्याचा विरोधक म्हणून नगरसेवक प्रयत्न करतील, असे सांगितले.
एमआयएमकडून निवडून आलेल्या २५ सदस्यांसह घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत महापालिकेच्या कामकाजावरूनही आमदार जलील यांनी शिवसेनेवर टीका केली. महापालिकेत खूप काही करण्यासारखे आहे. काही पक्ष तेच तेच जाहीरनामे वर्षांनुवर्षे दाखवत निवडणुका जिंकत आहेत. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी सर्वानी पुढे यायला हवे, असे सांगत महापालिकेत आदर्श काम करून दाखवू, असा दावा त्यांनी केला.
महापौर-उपमहापौरपद निवडणुकीसाठी एमआयएमकडून कोणते उमेदवार असतील, या बाबत नावाची निश्चिती झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नामकरणाच्या प्रस्तावाला मोठा विरोध होईल, असेही ते म्हणाले. बसपचे पाचही उमेदवार एमआयएमच्या संपर्कात असून काही अपक्षही संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हैदराबादी रिवाज!
महापालिकेच्या कामकाजात पहिल्या दिवशी सहभाग नोंदवताना एमआयएमचे सर्व नगरसेवक शेरवानी परिधान करतील, असे आमदार जलील यांनी आवर्जून स्पष्ट केले. हैदराबादमध्ये तो रिवाज आहे म्हणून आम्हीही तो पाळावा, असे ठरविले आहे. पुरुष शेरवानीमध्ये येतील. मग महिला नगरसेविकांसाठी एमआयएमने विशेष वेशभूषा ठरविली आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात तसे करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा