पश्चिम महाराष्ट्रातील काही नगरपालिका निवडणुकांमध्ये ‘एमआयएम’ने आपले उमेदवार उभे केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात सध्या खळबळ उडाली आहे. कराड आणि इस्लामपूर पालिकांमध्ये ‘एमआयएम’ची ही ‘कामगिरी’ सध्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कराड, इस्लामपूर, सांगली आणि मिरज शहरांमध्ये मुस्लीम समाज मोठय़ा संख्येने आहे. हा समाज सुरुवातीस काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. परंतु बदलत्या राजकीय चित्रामध्ये आता या समाजाला राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा समाजाधिष्ठित ‘एमआयएम’ हा पक्ष जास्त आपला वाटू लागला आहे. यातून यंदाच्या नगरपालिका निवडणुकींमध्ये ‘एमआयएम’ने कराड आणि इस्लामपूर पालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. या पालिकांमध्ये ‘एमआयएम’चे उमेदवार जी मते घेतील त्याचा फटका हा साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठय़ा प्रमाणात बसणार आहे.

इस्लामपूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील आणि भाजपप्रणीत विकास आघाडीचे निशिकांत पाटील यांच्यात चुरशीची लढत होत असली तरी ‘एमआयएम’ने या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी तर कराडमध्ये रुपाली लादे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे खा. ओवेसी यांनी इस्लामपूर व कराडमध्ये जाहीर सभा घेऊन मुस्लीम मतदार संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व मतदार पारंपरिकपणे राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जात आहे. मात्र बदलत्या राजकीय समीकरणात या मतांचे ध्रुवीकरण अटळ ठरण्याची चिन्हे दिसत असून याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत.

मिरज आणि कराड ही दोन्ही शहरे मुस्लीमबहुल म्हणून ओळखली जातात. गेल्या वर्षभरापासून एमआयएमने या ठिकाणी स्थानिक पातळीवर बठकांचे आयोजन करीत राजकीय वाटचाल सुरू केली आहे. मिरज मतदारसंघ आरक्षित असला तरी मागासवर्गीय समाजातील नेतृत्वाला पक्षात घेऊन पद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नगरपालिका निवडणुकीत जरी फारसे यश अपेक्षित नसले तरीही याकडे भविष्यातील राजकीय मांडणी म्हणून पाहिले जात आहे. ही चाचणी यशस्वी ठरावी यासाठीच खा. ओवेसी यांचा इस्लामपूर व कराड दौरा आयोजित करण्यात आला होता.

विधानसभेची रंगीत तालीम

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमने सार्वत्रिक निवडणुकीत घेतलेली उडी ही राष्ट्रवादीला धोक्याचा इशारा ठरण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम मानली जात असून एमआयएमने कराड, इस्लामपूर आणि मिरज हे मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघ लक्ष्य बनविले आहेत. यामुळे भविष्यात सांगली महापालिकेसाठीही राष्ट्रवादीला हे एमआयएमचे आव्हान ठरणार आहे.

Story img Loader