विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. तसेच शिवसेना पक्षात उभी फूट पडली. आता निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दरम्यान यावरच आता एमआयएमचे नेते असदुद्दी ओवैसी यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले आहेत. ते मुंब्रा येथे सभेला संबोधित करत होते.
हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”
शिंदे-ठाकरे कधीही एकत्र येऊ शकतात- असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यांनी एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “हे लोक म्हणत आहेत की देशातील धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे. मात्र येथे कोणती धर्मनिरपेक्षता आहे, हे मला सांगावे. शिवसेना पक्ष धर्मनिरपेक्ष आहे का? शिवसेना पक्ष कधीपासून धर्मनिरपेक्ष झाला, हे मला सांगा. शिवसेना पक्ष धर्मनिरपेक्ष झाला, असे राहुल गांधी सांगतील का? एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे हे राम आणि श्याम यांची जोडी आहे. ते कधीही एकत्र येऊ शकतात,” असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
राम-श्यामचा जुमला ओवैसींनाच सूट होतो– संजय राऊत
असदुद्दीन ओवैसी यांच्या याच टिप्पणीवर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राम-श्यामची जोडी तर ओवैसी आणि भाजपाला म्हणावे लागेल. असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असे लोक म्हणतात. जिथे भाजपाला विजयी करायचे असते, तेथे ओवैसी पोहोचतात. राम-श्यामचा जुमला ओवैसी यांनाच सूट होतो. शिवसेना स्वत:च्या ताकदीवर उभी आहे,” असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.