महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. या आघाडीत प्रहारसह राज्यातील छोटे राजकीय पक्ष ही आघाडी स्थापन करण्यासंदर्भात बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आता या पार्श्वभूमीवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे.
तिसऱ्या आघाडीसंदर्भात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, “तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत मला आतापर्यंत काहीही संकेत मिळाले नाहीत. मी एमआयएम पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मात्र, याबाबत मला कोणीही बोललं नाही. पण दोन दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यांच्याशी याबाबत चर्चा करताना त्यांना विचारलं की तिसरी आघाडीबाबत काही ऑफर आली तर काय करायचं? यावेळी त्यांनी सकारात्मक राहू असं सांगितलं”, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : “महायुतीचं नुकसान होईल असं…”, भुजबळ-शरद पवार भेटीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया
“एक गोष्ट आहे की महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुस्लीम समाज खूप चिडलेला आहे. त्याचं कारण एक आहे की, आज देशात जे निकाल लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट, कॉग्रेस आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं. पण यामध्ये मुस्लीम समाजाचा मोठा वाटा आहे. कारण मुस्लीम समाजाने दोन दोन तास उन्हात थांबून त्यांना मतदान केलं. पण याचा परिणाम काय झाला? तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाने मुस्लीम समाजाला एकही जागा दिली नाही. मग याचा अर्थ हा होतो की मुस्लिम समाज कुठे जाणार आहे?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.
तिसऱ्या आघाडीबाबत जलील काय म्हणाले?
“तिसऱ्या आघाडीबाबत सध्या कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू. सर्व समाजाच्या बाबतीत जोपर्यंत चांगली ऑफर येत नाही, मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरमुळे आठ उमेदवार मराठा समाजाचे निवडून आले. पण यामध्ये मुस्लीम समाजाचाही वाटा आहे. मग कोणी एका तरी खासदाराने बोलावं की आम्हाला मुस्लीम समाजाची मत मिळाली नाहीत. असे असतानाही मग एक मुस्लीम खासदार तुम्हाला का चालत नाही? आघाडीबाबत आम्हाला प्रस्ताव आला तर आम्ही नक्की विचार करू. आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार आमची अशी भूमिका नाही. आम्हालाही वाटतं की वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे असा प्रस्ताव आला तर आम्ही नक्की विचार करू”, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला तर?
या प्रश्नावर इम्तियाज जलील म्हणाले, “प्रस्ताव यायला तर पाहिजे. मी देखील मनोज जरांगे यांना एक प्रश्न विचारतो की, एक मुस्लीम खासदार तुम्हाला का चालला नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आमच्याबरोबर आला नाही. महाराष्ट्रात एकमेव मुस्लीम उमेदवार होता. पण तरीही तुम्हाला ते चाललं नाही. मग आता आम्ही आमची एक योजना आखली आहे. त्याआधी जर आम्हाला आघाडीसंदर्भात काही प्रस्ताव आला तर आम्ही विचार करणार आहोत. आम्ही सर्व २८८ जागांबाबत बोलत नाहीत. पण ज्या ठिकाणी आमची तयारी असेल ते आम्हाला जागा मिळत असतील तर विचार करू”, असं सूचक भाष्य इम्तियाज जलील यांनी केलं.