स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून टीका केली आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी वीर सावरकर यांचा उल्लेख भगौडे म्हणजेच पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हं निर्माण झाली आहेत. तसंच इम्तियाज जलील यांनी जे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन जलील यांच्यावर सुधीर मुनगंटीवार आणि संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.
इम्तियाज जलील यांनी काय वक्तव्य केलं
“आमजचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखत आणि भाजपाच्या ३६० खासदारांसमोर सांगितलं की आपल्या देशात फक्त एकच महापुरुष होऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच ते नाव आहे. भाजपाच्या नेत्यांनी हे मान्य केलं नाही, कारण त्यांच्या मते एकच महापुरुष ते म्हणजे सावरकर. पण ऐसे भगौडे को हम कभी माने हैं ना मानेंगे. (सावरकरांसारख्या पळपुट्यांना कधीही मानणार नाही.)” असं म्हणत वीर सावरकर यांच्यावर इम्तियाज जलील यांनी टीका केली.
जलील म्हणजे औरंगजेबाची अवलाद, शिरसाट यांचं प्रत्युत्तर
खासदार इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. कारण आमदार संजय शिरसाट यांनी यावर जलील यांच्यावर टीका केली आहे. “इम्तियाज जलील यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, ही औरंगजेबाची आणि निजामाची अवलाद आहे. त्यांना वीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असण्याचे कारण नाही. अशा निजामाच्या अवलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. वीर सावरकर हे राज्याचेच नाही तर देशाचे दैवत आहेत.” असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- वीर सावरकरांच्या काव्यातील ‘श्रीराम’!
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
आपला देश वीर सावरकरांना मानतो. त्यांनी (इम्तियाज जलील) यांनी मानलं नाही म्हणून वीर सावरकरांचे महत्व कमी होणार आहे? जलील हे राजकारणासाठी असं बोलतात, मतांच्या तुष्टीकरणासाठी हे सगळं चाललं आहे. मात्र वीर सावरकर यांचं योगदान आणि त्यांचं या देशावरचं ऋण कुणीही विसरु शकत नाही असं उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.