आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान, मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा असलेल्या एमआयएम पक्षानेही आपल्या स्तरावर या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पक्षाकडून सोईचे आणि जनाधार असलेल्या मतदारसंघांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या रुपात एकमेव खासदार आहेत. यावेळी ते कोठून निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे आता खुद्द जलील यांनी त्यांच्या संभाव्य मतदारसंघावर भाष्य केले आहे.
मुंबईतून निवडणूक लढवण्याचे संकेत
एमआयएमचा जलील यांच्या रुपात एकमेव खासदार आहे. ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जलील यांनी यांनी आगामी निवडणूक मुंबईतून लढवण्याचे संकेत दिले आहेत.
“मी निवडून येणार नाही, असे लोक म्हणायचे”
“गरिबांवर जेव्हा अत्याचार होतो, ज्यावेळी गरिबांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले, तेव्हा मला वाटले की आपण मुंबईतून लोकसभेची निवडणूक का लढवू नये. जनतेसाठी नवा मंच का तयार करू नये. त्याबाबत मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली होती. २०१९ साली मी संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा लोक म्हणायचे की मी निवडूनच येऊ शकत नाही. हा शिवसेनेचा गड आहे, त्यामुळे माझा विजय शक्यच नाही, असे लोक सांगायचे. मात्र तरीसुद्धा लोकांनी मला भरभरून मतं दिली होती. लोकांनी खूप साथ दिली होती. त्यामुळे अशीच परिस्थिती आपण मुंबईतही निर्माण करू शकतो,” असे जलील म्हणाले
“त्यांना कोठेही थारा मिळणार नाही”
दरम्यान, जलील यांच्या या विधानानंतर छत्रपती संभाजीनगरात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. शिवसेनेचे(शिंदे गट) नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. हिंदू मतांचे विभाजन झाल्यामुळे जलील निवडून आले होते. यावेळी मात्र जनता त्यांना स्वीकारणार नाही, असा दावा शिरसाट यांनी केला. “गेल्या निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन झाले होते. त्यामुळे जलील विजयी झाले. मात्र संभाजीनगरची जनता तीच चुक पुन्हा करणार नाही. हे जलील यांना समजले असेल. त्यामुळे संभाजीनगर मतदारसंघ सोडून जेथे मुस्लीम समाज बहुसंख्य आहे, त्याच ठिकाणी जाऊन निवडणूक लढवावी, असा त्यांचा विचार आहे. निवडणूक लढवताना ते अशाच पद्धतीने मतदारसंघ निवडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात त्यांना कोठेही थारा मिळणार नाही,” असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी मुंबईतून आगामी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरी ते मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार, यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट भाष्य केले नाही. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.