औरंगाबादमध्ये सरकारी जमिनीवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याला ‘एमआयएम’ने विरोध दर्शविला आहे. भाजपला मुंडे यांचे स्मारक उभारायचे असेल, तर खासगी जमीन विकत घेऊन त्यावर उभारावे, अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
औरंगाबाद शहरातील जालना रस्त्यावरील सरकारी दूध डेअरीची दोन एकर जागा मुंडे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे, असे जलील यांनी म्हटले आहे. इम्तियाज जलील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे भाजपचे मोठे नेते होते, यात शंका नाही. त्यांच्या अपघाती निधनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांच्या स्मारकासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निधी गोळा करावा आणि त्यातून खासगी जमीन विकत घेऊन स्मारक उभारावे. सरकारी जमीन वापरू नये. त्यातही पक्षाला जर खरंच मुंडे यांना श्रद्धांजली वाहायची असेल, तर औरंगाबादमध्ये गरिबांसाठी मोठे रुग्णालय उभारण्यात यावे. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही जलील यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा