भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी केलेले ‘सौदे’ जगजाहीर आहेत. त्यामुळे मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न हा पक्ष करत असून, भोकरच्या एमआयएमच्या कार्यकारिणीने राजीनामा देण्याचे ठरविले असल्याची माहिती या पक्षाचे भोकरचे अध्यक्ष जुनैद पटेल यांनी औरंगाबाद येथे एका पत्रकार बैठकीत दिली.
 औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम ६० उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याने या शहरात प्रचारासाठी असदोद्दीन ओवेसी येणार आहेत. त्यांचा प्रदेशाध्यक्ष काय करतो, हे समजावे आणि मुस्लीम समाजाचा या पक्षाकडून केवळ वापर होत आहे, हे सांगण्यासाठी आलो आहोत, असे जुनैद पटेल, नावीद पठाण, शफी पटेल यांनी सांगितले. भोकरमधील १९ जागांपैकी ८ ते १० जागांवर निवडणूक लढविली असती तर ६ नगरसेवक निवडून आले असते. मात्र, अशोकरावांशी हातमिळवणी केल्याने तेथे उमेदवारी दिली नाही. या हातमिळवणीसाठी मोठा सौदा झाल्याचा आरोपही जुनैद पटेल यांनी केला. भोकरमध्ये मुस्लिमांची ११ हजार लोकसंख्या आहे. तेथे सहज निवडणूक जिंकता आली असती, मात्र उमेदवारी देतो असे सांगून प्रदेशाध्यक्ष मोईनुद्दीन यांनी हैदराबाद येथे नेले. उमेदवारी दिली नाही असा आरोप पटेल यांनी केला. एवढी मोठी उलाढाल पक्षश्रेष्ठींच्या अनुमतीशिवाय होणेच शक्य नाही. हे लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या मुस्लीम व्यक्तींना सावधान करण्यासाठी पत्रकार बैठक घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला.

Story img Loader