मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस उग्र होताना दिसतंय. एकमेकांच्या टीकेला दोघेही लागलीच प्रत्युत्तर देतात. उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. मिंध्यांच्या दाढीला पकडून कुठूनही खेचून आणलं असतं असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“मुख्यमंत्री पद सोडताना मी हा विचार नाही केला की पद कसं सोडू? मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. पण कळत नव्हतं का की माझे आमदार फुटतायत? त्यांना पकडून हॉटेलमध्ये ठेवू शकत नव्हतो? या मिंध्यांच्या दाढीला खेचून कुठूनही उचलून आणलं असतं. पण सगळ्यात आधी नासके आंबे फेकून दिले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “अडीच वर्ष वर्षाची माडी नाही उतरलात मग दाढीपर्यंत कसे पोहोचाल?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “मिंध्याच्या दाढीला खेचून आणलं असतं असं ते म्हणाले. मात्र, या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहीत आहे. लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणायचे आहे. विधानसभेतही विजय मिळवायचा आहे. कामाला लागलं पाहिजे. जनता आपल्या पाठीशी आहे, घरी बसणारे नकोत, त्यांना तर आधीच घरी बसवलं आहे.”
“ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण वाचावण्याचं काम केलं त्यांना तुम्ही खड्ड्यात गाडण्याची भाषा करताय. नियती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जो दुसऱ्यांचा खड्डा खोदतो त्याचाही खड्डा तयार झालेला असतो”, असंही ते म्हणाले.