जळगाव जामोद परिसरातील महसूल विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागातील अवैधरीत्या वापरलेल्या गौण खनिजाची माती किंमत दंड आकारून वीटभट्टी मालकांकडून एकूण ३१ लाख ९ हजार ९८० रुपये वसूल केले जाणार आहेत.
या विभागातील वीटभट्टीधारक हे झाडेगाव, मानेगाव, खांडवी, गाडेगाव बु., पिंपळगाव काळे आदी परिसरातील असून त्यांनी अवैधरीत्या शासनाच्या गौण खनिजाचा वापर करून लाखोंचा महसूल बुडविला. त्याची वसुली ३१ मार्चपूर्वी महसूल प्रशासन करणार आहे. त्यामुळे वीटभट्टीधारकात दंड भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी नाही. प्रदूषण मंडळाच्या अटी, शर्ती व व्यवस्थेचे पालन करण्यास किंवा तसे वागण्यास वीटभट्टीमालक तयार नाहीत, परंतु महसूल विभाग कारवाई करतात, पण या वीटभट्टय़ांमुळे प्रदूषणचा उद्रेक असतानाही जळगाव, नांदूरा रोडवर भूरी राखेची भुकटी, कोळशाचे कण, रस्त्यावर उडत येऊन प्रवाशांच्या नाकातोंडात व डोळ्यात जातात, पण प्रवासी किंवा नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रदूषण मंडळ लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. वीटभट्टीमालक परवानगी मागत नाही आणि प्रदूषण मंडळ कारवाई करत नाहीत. प्रदूषण मंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मागील वर्षांत अवैध गौण खनिजांची रेती व मातीची २७३ प्रकरणे होऊन त्यामधून ११ लाख ७९ हजार ३०० रुपयांचा महसूल शासनजमा झाला. तरीही अवैधरीत्या गौण खनिजांचा वापर सर्रास सुरूच आहे. त्यात गर्भश्रीमंत व राजकीय वरदहस्त असलेल्याच व्यक्ती असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. एकूण २९ वीटभट्टीधारकांनी ४ लाख २ हजार ४०० रॉयल्टी प्रती ब्रास प्रमाणे बाजार मूल्य ८० रुपयांच्या तीन पटीत येणारी रक्कम १२ लाख ७ हजार २०० रुपये प्रती गुंठय़ाप्रमाणे ३० हजार ६२० रुपये, जि.प.सेसच्या ७ पट २ लाख १४ हजार ३४० रुपये, ग्रामपंचायत सेसच्या १ पट ३० हजार ६२० रुपये, अनधिकृत अकृषक वापराबद्दल दंड आकारणीच्या ४० पट १२ लाख २४ हजार ८०० रुपये, असा एकूण ३१ लाख ९ हजार ९८० रुपयांचा महसूल शासन जमा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
दरम्यान, १८ मार्चला दुपारी पूर्णा नदीच्या पात्रातून दोन ट्रॅक्टर्समधून गौण खनिज भरून नेताना व एक जेसीबी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ती वाहने जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात लावली. यापैकी एक ट्रॅक्टर (एमएच २८ ई ४१९६) ट्रॉली (क्र.एमएच २८ टी ६४८६) आहे व दुसरे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आणि जेसीबी वाहनावर कारवाई सुरू आहे.

Story img Loader