देश आणि राज्यावर करोनाचं संकट घोंगावत असताना राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आता भारत बायोटेकने लस निर्मितीसाठी पुण्यातील जागा निवडल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात पळवल्याचा आरोप भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर देत आरोप खोडून काढले आहेत.

“पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे”, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

भर वादळातही एकनाथ शिंदेंना उद्घाटनाचा मोह आवरेना!

भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा लि. कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दाद मागितली. उच्च न्यायालयाने करोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

हे तर ग्रहणांचेही बाप; चक्रीवादळावरून नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर टीकास्त्र

“कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत”, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Story img Loader