राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिली दिवाळी असल्यानं पवार कुटुंब एकत्र येणार का? याबाबत कार्यकर्त्यांसह अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र, दिवाळी पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथेप्रमाणे गोविंद बागेत हजेरी लावली. तर, बुधवारी ( १५ नोव्हेंबर ) भाऊबीजनिमित्त अध्यक्ष शरद पवार अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले होते.
यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते माढ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “राजकीय धोरण आणि व्यक्तिगत अंतर ठेवण्याची साम्यता आम्ही पाळतो. सत्तर वर्षापासून आम्ही भाऊ आणि मुले कुठेही असू दिवाळीला बारामतीत असतो. या भेटीत राजकीय लवलेश कुठलाही नव्हता,” असं शरद पवारांनी सांगितलं.
विधानसभा अधिवेशानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील, असं विधान मंत्री अनिल पाटील यांनी केलं. याबद्दल पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “अनिल पाटील यांच्या मतदारसंघात ( अमळनेर-जळगाव ) मी आताच जाऊन आलो आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आलेले दिसणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही राज्यांत ओबीसी असल्याचा दावा करत आहेत. पंतप्रधान मोदी विकासावरून जातीच्या राजकारणावर आले आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी म्हटलं, “दुर्दैवाने पंतप्रधान मांडत असलेल्या गोष्टीचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही. मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांच्यापासून सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली आहेत. पंतप्रधान विरोधकांच्या राज्यात गेले, तर व्यक्तिगत हल्ले करतात. चार राज्यांच्या निवडणुकीतही हेच चित्र दिसत आहे. लोक हे मान्य करणार नाही आणि त्याची किंमत पंतप्रधानांना चुकवावी लागेल.”