राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
नेमकं प्रकरण काय?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढली. त्यावेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती. त्यामुळे भाजपाचे गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडूंविरोधात २७ डिसेंबर २०१७ रोजी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यात बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात तब्बल ५ वर्षानंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल दिला. तसेच त्यांना २ महिने सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा : “अभ्यास करून मेरिटमध्ये ये, मग नोकरी मिळेल असं म्हणायचे दिवस संपले की काय?” बच्चू कडूंचा हल्लाबोल
दरम्यान, बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांचं विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी केली आहे.