भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले. यानंतर या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भागवत कराड म्हणाले, “रिझर्व्ह बँकेकडून एका निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार चलनातील २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी ६ महिन्याचा वेळ आहे.”

“आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय अनेकदा घेते”

“आरबीआय ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, आपल्याकडे असणाऱ्या २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकेत जमा करा. एकावेळी २० हजार रुपयांच्या नोटा जमा करता येतील. आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय अनेकदा घेते,” असं मत भागवत कराड यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहाराची माहिती”

या निर्णयानंतर मागीलप्रमाणे सर्वसामान्यांचे हाल होणार का? यावर भागवत कराड म्हणाले, “यावेळी तसं काही पहायला मिळणार नाही. कारण पुरेसा ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय आता हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहार माहिती झाले आहेत. त्यामुळे बँकेतील व्यवहार डिजीटल माध्यमातून होत आहे.”

हेही वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोदी सरकारला ८७,४१६ कोटी रुपये देणार

“सर्वांना डिजीटल व्यवहार माहिती आहेत”

“सर्वांना डिजीटल व्यवहार माहिती आहेत, ते हे व्यवहार शिकले आहेत. बाकी ज्यांना बँकेत जाऊन पैसे जमा करायचे आहेत ते कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करू शकतात,” असंही कराड यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister bhagwat karad comment on rbi decision of two thousand note currency rno news pbs