सोलापूर : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला त्रास देणाऱ्या पाटलांचा ‘चौरंग’ करून कठोर शिक्षा दिली होती. त्याचा हवाला देत गोगावले यांनी राजन पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला.

गोगावले हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ आणि पंढरपूर दौऱ्यावर आले असताना मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी गोगावले यांचे जंगी स्वागत केले. आमदार खरे यांनी यापूर्वीच, मोहोळ विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्ह घेतली, ही चूक होती. आपण महाआघाडीत असलो तरी आपणच सत्तेत आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याची प्रचिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या भेटीप्रसंगी सर्वांना आली.

गोगावले यांच्या स्वागतासाठी आमदार राजू खरे यांच्या समर्थकांनी उभारलेल्या स्वागत फलकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भरत गोगावले आदींच्या छबी ठळकपणे दिसून आल्या. तेथे कोठेही शरद पवार व अन्य नेत्यांच्या छबी दिसल्या नाहीत. आमदार राजू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून मोहोळ राखीव विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या साम्राज्याला हादरा दिला होता. त्याचा संदर्भ देऊन भरत गोगावले यांनी, दोन वर्षांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा कडक शब्दांत समाचार घेतला. त्यांच्या भाषणाची चित्रफीत समाज माध्यमावर फिरत आहे.

अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलता आले असते, पण इकडे महिला भगिनी बसल्या आहेत, असे म्हणत गोगावले यांनी, ‘अति तेथे माती ‘ हे प्रत्येकाचे ठरलेले आहे. गर्वाचे घर हमेश रिकामे असते. त्याला उन्माद आला, त्याचा सत्यनाश झालाच म्हणून समजा. जनतेने तुम्हाला चांगली संधी दिली होती. पण काय तुमचे वक्तव्य? काय तुमचे वागणे? तुमची ही पाटिलकीच ना? शिवशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलांचा ‘चौरंग’ केला होता, याचा संदर्भ देत, राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत, त्यांना सावधानतेचा इशारा दिला.

Story img Loader