अलिबाग : वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावर संताप व्यक्त करत राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही. राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो, असे वाद उकरून काढू नका, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे नाव न घेता केले आहे. लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत हे तुम्हाला कळत नाही का, तुमचे कान पितळी झाले आहेत का, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचे युवराज संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रात नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांना लिहून हा पुतळा ३१ मेपूर्वी हटवावा अशी मागणी त्यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किल्ले रायगडाची पाहाणी केली. यावेळी महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमीमंत्री भरत गोगावले हेदेखील उपस्थित होते. शेलार यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी होत असली, तरी याबबात चर्चा करू, त्यानंतर सविस्तर अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करू, असे स्पष्ट केले.

१२ एप्रिल रोजी अमित शहा रायगडावर

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने किल्ले रायगडावर ११ आणि १२ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत . या पार्श्वभूमीवर राज्यातील चार मंत्र्यांनी आज रायगडवरील तयारीचा आढावा घेतला.