संजय राऊत मनोरुग्ण – राधाकृष्ण विखे पाटील

पंढरपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढविणे, असे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे, असे खडे बोल महायुतीतील नेत्यांना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहेत, तर संजय राऊत यांच्या नेत्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल करावे. राऊत हे मनोरुग्ण आहेत, अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानंतर परिचारक यांच्या सांत्वनपर भेटीसाठी पाटील पंढरपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्ष राज्याचा एक निर्णय कधीच करीत नाहीत. स्थानिक पातळीवर संबंधित शहरात कोणाचे किती काम आहे, यावरून निर्णय घेतले जात असतात. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर प्रभाग रचना होईल. मगच निवडणुकांबाबत निर्णय होईल. आता बोलणे उचित नाही, असे पाटील म्हणाले. तर सांगोला उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे आवाहन संपुष्टात आले आहे. त्यांच्या संबंधी काय बोलायचे, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला, तर संजय राऊत यांच्या विषयी प्रश्न विचारला असता विखे पाटील यांनी बोचरी टीका केली. एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यावर त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेतात. आता राऊत यांच्या नेत्यांनी त्यांना दवाखान्यात न्यावे. ते मनोरुग्ण झाले आहेत, असे विखे पाटील म्हणाले. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाबाबत आता अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. जो कोणी वाळू चोरी करेल, त्याच्यावर संबंधित अधिकारी कारवाई करतील आणि जर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करणार, असा सज्जड दम पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भरला.

Story img Loader