देशात भाजपाप्रणित रालोआ सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही मंत्रीपद देण्यात आलं असून ते देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यामुळे भाजपाकडून नवे अध्यक्ष निवडले जाणार हे स्पष्ट आहे. यासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत आहे. विनोद तावडे हे सध्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचं सूचक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“विनोद तावडे कर्तृत्ववान आहेत. त्यांना जिथे पाठवू तिथे यश कसं मिळेल याचे बारकावे ते शोधतात. १९९५ ला विनोद तावडे हे महाराष्ट्र भाजपाचे सरसचिटणीस झाले. त्यानंतर चारच वर्षांत ते भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीला गेले. आता ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्ष चालवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विनोद तावडेंना कुठली जबाबदारी द्यायची ते वरिष्ठ ठरवतील. एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरचा कार्यकाळ संपल्यावर त्याला बदललं जातं. विनोद तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही

“भाजपात खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तरीही विनोद तावडे मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.

हे पण वाचा भाजपसाठी कोथरूड नवे ‘सत्ताकेंद्र’, ‘कसब्या’ची मक्तेदारी संपुष्टात

अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना थांबण्यास सांगितलं आहे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या थेट नऊपर्यंत खाली घसरली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. भाजपा पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांनी थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.