शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. या निवडणूक चिन्हावरच शरद पवार यांचा गट आता निवडणूक लढवणार आहे. याच चिन्हावर आम्ही विजयी कामगिरी करू, असा दावा शरद पवार यांच्या गटातील नेत्यांकडून केला जातोय. अजित पवार गटातील नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. नव्या चिन्हासह लोकांपर्यंत पोहोचायचं म्हटल्यावर थोड्याफार अडचणी येणारच आहेत. १९९९ साली आमची ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतं काँग्रेसला गेली होती, असे त्यांनी सांगितले. ते आज (२३ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
शरद पवार म्हणजे घड्याळ असे लोकांना वाटते
“शरद पवार गटाला आता तुतारी हे नवे चिन्ह मिळाले आहे. आता नव्या चिन्हामुळे मतदानावर थोडा-फार परिणाम तर होणारच. कारण नवं चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवायचं काम सोपं नसतं. आता प्रत्येकाकडं स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. त्यामुळे या माध्यमातून हे चिन्ह लवकर दूरवर पोहोचू शकते. पूर्वी फार अडचणी यायच्या. मात्र आता थोडीफार तरी अडचण येणारच. खेड्यांमध्ये राहणाऱ्या मंडळींच्या मनात काही गोष्टी पक्क्या असतात. शरद पवार म्हणजे घड्याळ, असे ग्रामीण भागातील काही लोकांना वाटते. मग अशा वेळी अडचण येणार आहे,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळांनी सांगितलं १९९९ साली काय घडलं होतं
“१९९९ साली असेच घडले होते. तेव्हा २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक मतं ही हाताचा पंजा या निवडणूक चिन्हाला गेली. आम्ही लोकांना विचारायचो की तुम्ही कोणाला मत दिले. लोक सांगायचे की आम्ही हाताचा पंजा म्हणजेच शरद पवारांना मत दिलं. मात्र त्या निवडणुकीत आमचे निवडणूक चिन्ह हे घड्याळ होते. आम्ही तेव्हा काँग्रेसच्या बाहेर होतो. आता मात्र तेवढी अडचण येणार नाही,” असेही छगन भुजबळ म्हणाले.
शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच, अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही. तर, निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.