Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी बारामतीतल्या सभेत १४ जुलैला शरद पवारांवर टीका केली. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम पवार करत असल्याचं भाषणात भुजबळ म्हणाले. या भाषणाला २४ तास उलटण्याच्या आत छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छगन भुजबळ यांची ही कृती सगळ्यांसाठीच अनपेक्षित म्हणावी अशीच ठरली. कारण सोमवारी सकाळी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पोहचले. छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट का झाली याचं कारण समोर आलेलं नाही.
छगन भुजबळ यांचा आरोप काय?
“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे
“विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो. मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ” असं बारामतीत छगन भुजबळ म्हणाले होते. याच भुजबळांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
हे पण वाचा- जितेंद्र आव्हाड यांचं छगन भुजबळांना उत्तर, “शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत…”
छगन भुजबळ पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत आपले काका आणि त्यांचे राजकीय गुरु शरद पवार यांना धक्का दिला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदारही आले. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याबाबत शरद पवारांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. छगन भुजबळ तिकडे गेले त्याबाबत शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, “तिकडे (अजित पवार गट) काय चाललं आहे बघून येतो. त्यानंतर त्यांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली.” हे वक्तव्य ऐकून एकच हशा पिकला होता. त्यानंतर शरद पवार यांच्यावर छगन भुजबळांनी टीकाही केली. लोकसभेच्या निवडणुकीआधीही भुजबळ यांनी काही मुलाखती दिल्या त्यातही त्यांनी शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एवढंच काय रविवारी बारामतीत त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले. हेच छगन भुजबळ सोमवारी शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.