जालना : ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपला मतदान करतात असे सांगितले जाते. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा छगन भुजबळ यांनी शुक्रवारी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेत आपल्याच सरकारला दिला.

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना पोलिसांवर दगडांचा मारा झाला. ७० पोलीस जखमी झाले. एवढे पोलीस जखमी झाल्यानंतर लाठीमार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांची बाजू ऐकून घेतली गेली नाही. गृहमंत्र्यांनीच नंतर माफी मागितली. त्यामुळे जरांगे यांची हिंमत वाढली, अशी टीका भुजबळ यांनी केली.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, विधान परिषद सदस्य राजेश राठोड, अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, टी. पी. मुंढे, आमदार देवयानी फरांदे, आशिष देशमुख, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण गायकवाड आदींची भाषणे या वेळी झाली.

हेही वाचा >>> मनोज जरांगेंच्या बाजूने प्रकाश आंबेडकर मैदानात, टीका करणाऱ्या छगन भुजबळांना म्हणाले, “समाजांना भिडवण्याचं…”

भुजबळ म्हणाले, की प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर यांची घरे पेटवण्यासाठी पेट्रोल बॉम्ब घेऊन आले. त्यांच्यापासून मुलाबाळांना जीव वाचवावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकियांची घरे जाळायला सांगितली का, असा सवाल भुजबळ यांनी केला. न्या. निरगुडे आयोगास मराठा आरक्षणाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तीन न्यायमूर्ती गेले आहेत, असे म्हणत भुजबळांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

जरांगे पाणी पीत नव्हते तेव्हा आमचे मंत्रीही त्यांच्यापुढे वाकले होते. त्यांना भेटायला मंत्री गेले, पण न्यायमूर्तीनाही बरोबर घेऊन गेले. ते न्यायमूर्तीही जरांगेस ‘सर’ म्हणू लागले. हे काय चालले आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सरकारच्या कृतीचा उपहास केला. आता जातनिहाय जनगणना करा, म्हणजे संख्या किती आहे ते कळेल, असेही भुजबळ म्हणाले.

पहिल्यांदा पाच हजार कुणबी पुरावे सापडले. नंतर तेलंगणमध्ये निवडणुका असल्याने तेथे जाऊन पुरावे मिळवता येत नाही असे सांगण्यात आले आणि नंतर ११ हजार जणांकडे पुरावे असल्याचे सांगण्यात आले. मंत्रिमंडळासमोर तर त्यात आणखी भर घालणारा आकडा आला. हे कसे झाले, असे म्हणत भुजबळ यांनी सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा >>> VIDEO : “राज्यातील समाज एकमेकांसमोर उभे राहतात, ही परिस्थिती…”, मराठा अन् ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

जरांगेंवरही हल्ला

माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न परत करू नको, असा इशारा देत भुजबळ यांनी जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्रांची संख्या आणि त्या अनुषंगाने प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले.

स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६८ मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे. त्यानंतर बी. पी. मंडल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभर फिरून तयार केलेला अहवाल तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी स्वीकारून ५४ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ओबीसींशिवाय इतरांना आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. परंतु सध्या जे मराठा दैवत निर्माण झाले आहे ते धनगर, माळी, तेली यांना आरक्षणात मध्येच घुसवल्याचे सांगतात, असे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख टाळून भुजबळ म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायमूर्तीच्या पीठाने ओबीसींना मंडल आयोगाचे आरक्षण दिले पाहिजे, असे सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ओबीसींना आरक्षण देण्यास सांगितले होते. खत्री, बापट, सराफ इत्यादी आयोगांनी मराठा समाजास आरक्षण देता येत नाही असे सांगितले, तर त्यात आमचा काय दोष आहे, असे सांगून भुजबळ आंदोलक मनोज जरांगे यांना उद्देशून म्हणाले, ‘ज्यांना काही माहीत नाही ते सकाळी उठतात आणि काहीही बोलतात. मी स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडीत नाही! वर्षांनुवर्षे दबलेल्यांना संविधानाने आरक्षण दिले आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.’

मराठा आरक्षणाला विरोध नाही..

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आपण विरोधी पक्षनेता असताना राज्याने दिलेले मराठा आरक्षण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्या सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या भूमिकेचा उल्लेख भुजबळ यांनी आपल्या भाषणात केला. मनोज जरांगे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून ते म्हणाले, दगडाला शेंदूर फासून लोक यांच्या मागे लागले आहेत. आमची लेकरे-लेकरे असे तुम्ही म्हणता. आमचीही लेकरे आहेत. तुम्ही वेगळे आरक्षण घ्या. या वेळी भुजबळ यांनी मराठा समाजास विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांचाही तपशील दिला आणि ओबीसींकडे या संदर्भात दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.

पोलिसांची बाजू पुढे आलीच नाही..

प्रकृती चांगली नसल्याने उपोषणातून उठा, अशी विनंती करण्यास गेलेल्या पोलिसांना जरांगे यांनी नंतर येण्यास सांगितले. नंतर पोलीस गेले तेव्हा त्यांच्यावर दगडांचा मारा झाला, असा आरोप करत भुजबळ म्हणाले, जखमी झालेले ७० पोलीस तेथे पाय घसरून पडले होते काय? जखमी महिला पोलिसांना विचारले तर काय झाले ते त्या सांगतील. या प्रकरणात एकच बाजू समोर आली, पोलिसांची बाजूच समोर आली नाही! लाठीमार झाल्यावर हे शूर सरदार (जरांगे) घरात जाऊन बसले होते. शरद पवार भेटीसाठी येणार म्हणून त्यांना आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे यांनी घरातून आणले, असा आरोप भुजबळ यांनी केला. शरद पवार उत्कृष्ट प्रशासक आहेत. त्यांना खरे दाखवले गेलेच नाही. गृहमंत्र्यांनी क्षमा मागितल्यावर यांची हिंमत वाढली, असे भुजबळ यांनी जरांगे यांना उद्देशून भुजबळ म्हणाले.

फडणवीस यांच्या उल्लेखावर आक्षेप

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांनी नागपूर येथे ओबीसींचा मोर्चा काढला त्या वेळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले आणि ओबीसी आरक्षणात इतरांना वाटेकरू होऊ देणार नाही, असे आश्वासित केले होते, असे आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी उभे राहून याबद्दल आक्षेप घेतला. देशमुख यांचे भाषण आटोपल्यावर संचालन करणाऱ्याने याचा उल्लेख करून सर्व वक्त्यांना सांगितले की, येथे सर्वजण ओबीसी म्हणून आलेले आहेत. त्यामुळे येथे कोणीही आपल्या भाषणात राजकीय पक्षाचा उदो उदो करू नये. अंबड येथील ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेतील फडणवीसांच्या उल्लेखामुळे गोंधळ झाला.

भुजबळांची हकालपट्टी करा

मुंबई : छगन भुजबळ केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत भांडणे लावण्याचे पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारचीही हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे. अन्यथा भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे केली आहे.

‘भुजबळांची भूमिका ओबीसी दृष्टिकोनातून’  

मुंबई : छगन भुजबळ यांनी ओबीसी नेते म्हणून त्यांची भूमिका मांडली आहे, असे स्पष्ट करत, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने खबरदारी घ्यावी, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मांडली. तसेच निधी वाटपावरून पक्षात नाराजी नाही, असा दावाही त्यांनी केला.