सावंतवाडी : मालवण येथे समुद्रकिनारालगत शासकीय ९ एकर जमीन आहे. त्या जमिनीवर महाराजांना साजेसे स्मारक, शिवसृष्टी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची चित्रसृष्टी तयार करता येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाईल असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीनंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला ही अतिशय दुःखद घटना आहे, झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. वाईटातून चांगले व्हावे असे मी म्हटले होते. मात्र त्यावर राजकीय नेते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली. ते आले आणि गेले. मात्र स्मारक आम्हीच करणार आहोत, त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : “…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!

केसरकर पुढे म्हणाले, मालवण येथे ९ एकर जमीन शोधली आहे. त्या ठिकाणी महाराजांचे स्मारक, शिवसृष्टी, जेटी बांधता येईल. याठिकाणी जेटी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला, शिवसृष्टी दाखवता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. आता तसा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवला जाईल. शिवप्रेमी आणि पर्यटकांना ते दाखवता व आकर्षित करता येईल.

हेही वाचा : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी वन विभागाची मोठी कारवाई; चौघांना घेतले ताब्यात

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सर्वोत्कृष्ट शिल्पकार बनवेल. सिंधूरत्न योजनेतून विजयदुर्ग येथे आरमाराचे प्रतीक चित्रसृष्टी उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. तेथे देखील पर्यटकांना आकर्षित करू शकतो असे केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच या पुतळा दुर्घटनेमुळे राज्य सरकार आणि नौदल हे टिकेचे लक्ष बनल्याच्या पार्श्वभूमीवर शिवपुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीने आज बुधवारी मालवण राजकोट किल्ल्याला भेट देऊन कोसळलेल्या शिवपुतळ्याची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान शासकीय यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळतानाच राजकोट परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमानाही या पाहणी दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister deepak kesarkar chhatrapati shivaji maharaj memorial and statue on nine acre land in malvan css