कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले. जमीन घोटाळा, कृषि महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्तार यांचा राजीनामा मागितला. तर त्यांनी महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला असून यामध्ये पक्षातील नेत्यांचा हात आहे का? असा संशय सत्तार यांनी व्यक्त केल्यानंतर आता शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि संजय गायकवाड यांनी मत व्यक्त केले आहे.
टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “अब्दुल सत्तार अनेकवेळा गमतीने बोलत असतात. त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे हे मला माहीत नाही. काही झाले असेल तर निश्चितपणे त्यात लक्ष घातले जाईल. पण पक्षांतर्गत घडामोडी झाल्या असतील तर त्याच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात. या प्रकरणात मुख्यमंत्री आवश्यक तो निर्णय घेतील. पक्षांतर्गत बाबींची जाहीर चर्चा करण्याची पद्धत कुठल्याही पक्षात नसते. आमच्याही पक्षात तशी पद्धत नसते. याची आम्ही काळजी घेऊ.”
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आमची एक मीटिंग झाली होती. त्याची माहिती लगेच बाहेर कशी आली? आपले लोक लगेच बाहेर काढतात. असं नाही व्हायला पाहीजे. अंतर्गत चर्चा बाहेर नाही काढली पाहीजे. आमच्यातले कुणी काय करत असेल तर माहीत नाही. पत्रकारांनाच त्यांच्याकडून जास्त माहिती मिळते. राजकारणामध्ये राज करण्यासाठी काही कारणे शोधावी लागतात, तसे काहीजण शोधत आहेत. पण मी माझे काम करत राहिल”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
या विषयावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “मला माहिती नाही अब्दुल सत्तार नक्की काय म्हणाले. पण गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. आमच्या ५० लोकांमध्ये कुठलाही गैरसमज नाही.”
विरोधी पक्षानीतल नेत्यांची खेळी असू शकते
आमचे सर्व लोक एका जीवाचे, एका दिलाचे आहेत. अब्दुल सत्तार यांचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो किंवा ही विरोधी पक्षानीतल नेत्यांची खेळी असू शकते, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. तरिही अब्दुल सत्तार यांचा कुणावर संशय असेल तर त्याचा माग मुख्यंत्री एकनाथ शिंदे घेतलीच. यात जर तथ्य असेल तर संबंधिताला योग्य ती समज दिली जाईल. “अब्दुल सत्तार यांचा खेळीमेळीचा स्वभाव आहे. ते २४ तास हसतमूख असतात. हिवाळी अधिवेशनात आम्हाला ते नाराज वाटले नाहीत”, असे सांगत संजय गायकवाड यांनी आरोप फेटाळून लावले.