अजित पवारांसह ९ मंत्र्यांचा शपथविधी होऊन बारा दिवस उलटले आहेत. अद्यापही अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांना खातेवाटप झालं नाही. भाजपा आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी महत्वाची खाती अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांना देण्यास विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून खातेवाटपात गडबड होणार आहे. म्हणून खातेवाटपास थोडा विलंब होत आहे. पण, याचा अर्थ खातेवाटपावरून कोणी नाराज नाही आहे. अर्थमंत्रीपदाबाबत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,” असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा : “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे…”, मिटकरींची आव्हाडांवर…
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे? याबद्दल विचारल्यावर गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की, “उद्या ( १४ जुलै ) सकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं ऐकण्यात येत आहे.”
हेही वाचा : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीने…”
खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “माझी माहिती आहे की, अजित पवारांचा गट ज्या खात्यांसाठी आग्रह धरून बसला आहे. त्या खात्यांबाबत दिल्लीतील नव्या बॉसने शब्द दिला आहे. हा शब्द पूर्ण होतो की नाही हे पाहूया. गृहनिर्माण, ग्रामविकास, अर्थखाते, समाजकल्याण ही खाती अजित पवारांच्या गटाने मागितली आहेत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.