कराड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, तेव्हा ते साधुसंत. आता मात्र,  त्यांच्यासोबत नसल्यामुळे त्यांना ते गुंड वाटतात, असा टोला राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.

कराड विमानतळावर माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ यांचे छायाचित्र समाज माध्यमावर  प्रसारित झाल्याने खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा गुंडगिरीचा अड्डा बनला असल्याची टीका केली आहे. या संदर्भात छेडले असता, मंत्री पाटील यांनी नेत्यांच्या गराड्यात कोण असतात, त्यातील कोणाची काय वृत्ती हे कोणी तपासत नाही असा निर्वाळाही दिला.

हेही वाचा >>>“…तरी पक्षाचा बाप आमच्याबरोबर आहे!”, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शिंदे गटातील गद्दारांना गाढण्याची भाषा केली जातेय. पण, काय करायचे आता जनताच ठरवेल असे सूचक विधान मंत्री पाटील यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांचे आशीर्वाद घेवून इतर मागास (ओबीसी) समाजाकडून वेगळा पक्ष काढण्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. याबाबत विचारले असता, मंत्री पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे मंडल आयोगापासून इतर मागास (ओबीसी) समाजासाठी काम करत आहेत. त्यांचा मार्ग इतर मागास समाजाचा आहे. त्यांना जे वाटतं ते भुजबळ बोलतात. परंतु,  वेगळ्या पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय ते घेणार नाहीत. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या असतीलतर  व्यक्त झालेली त्यांची भावना म्हणजे कृती नव्हे, त्यांनी केलेले वक्तव्य कृतीत आले तरच त्यावर अधिक बोलणे उचित ठरेल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader