सोलापूर : माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणातील वाटचालीत कोणी कितीही अडथळे आणले, गतिरोधक उभारले तरीही हे अडथळे दूर करून ताठ मानेने उभा राहण्याची ताकद माझ्यात आहे, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तीर्थक्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत श्री सावता माळी समाधी मंदिरात आयोजित चंदन उटी उत्सव सोहळ्यात गोरे हे बोलत होते. यावेळी ओबीसी विकास, ऊर्जा, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचीही उपस्थिती होती.
पालकमंत्री गोरे यांचे यावेळी धारदार भाषण झाले. महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगाव आणि त्यांच्या मूळ आडनावाचा संदर्भ देत गोरे म्हणाले, महात्मा फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील कटगुण आहे. त्यांचे मूळ आडनाव गोरे आहे. माझेही मूळगाव कटगुण आहे आणि आडनावही गोरे आहे. परंतु हे मला सांगण्याची गरज भासत नाही. ज्यांना काही मिळवायचे आहे, त्यांना या गोष्टी सांगाव्या लागतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यामध्ये मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असा दावा त्यांनी केला.
मी एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने जनतेची सेवा करण्यासाठी मला मंत्रिपद मिळाले आहे. राजकारणात कोणत्यातरी विचारांचे असल्याशिवाय सत्ता मिळत नाही. मला भाजपच्या विचारांमुळे मंत्रिपद मिळाले आहे. राजकारणात वावरताना माझ्यासमोर अडथळे आणले जातात. राजकीय वाटचालीत गतिरोधक उभारले जातात. पण कोणीही आणि कितीही असे अडथळे आणले तरीही मी त्यावर मात करून पुढे जात आहे. राजकारणात काम करीत असताना राजकारण करावेच लागते. राजकारण केल्याशिवाय विकास होत नाही. मला राजकारण करताना राज्यातील तीर्थस्थाने बळकट करायची आहेत. यासाठी जे सोबत येतील, त्यांना मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.