शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले. यामुळे विधवा महिलांचा सन्मान वाढेल, असा दावा मंत्री लोढा यांनी केला. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही या शब्द सुचवण्याच्या निर्देशांवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी (१३ एप्रिल) पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
मंगल प्रभात लोढा म्हणाले, “गंगा-भागिरथीसह ज्या शब्दांचे पर्याय सुचवणारे संघटनांचे अर्ज आले ते मी चर्चेसाठी महिला व बालविकास विभागाकडे पाठवले आहेत. याशिवाय काहीही झालेलं नाही. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही किंवा शासन आदेशही काढण्यात आलेला नाही.”
“या शब्दावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही”
गंगा भागिरथी शब्दामुळे स्त्री-पुरुष समानतेला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. याविषयी विचारलं असता लोढा म्हणाले, “या शब्दामुळे सुप्रिया सुळेंचं तसं म्हणणं असेल. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मला केवळ एक पत्र आलं होतं आणि ते मी चर्चेसाठी विभागाला पाठवलं आहे. यामुळे काय झालं आहे? याआधीही एक पत्र आलं होतं. तेही मी विभागाला पाठवलं होतं, हेही पत्र पाठवलं.”
काँग्रेसने लोढा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असा आरोप केला. यावर लोढांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
हेही वाचा : विधवांचा उल्लेख ‘गंगा भागीरथी’ करा! मंगलप्रभात लोढा यांचा प्रस्ताव, महिला संघटनेचा आक्षेप
“पूर्णांगी, स्वयंसिद्धा, सक्षमा अशी तीन नावं असताना गंगा भागिरथी नाव का?”
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विधवा शब्दाला पर्याय म्हणून पूर्णांगी, स्वयंसिद्धा, सक्षमा अशी तीन नावं सुचवली होती. अशी तीन नावं असताना गंगा भागिरथी हे नाव कोठून आलं? असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मंत्री लोढा म्हणाले, “या नावाची सुचना देण्यात आली. विविध संघटनांनी हे नाव सुचवलं. ती नावं विभागात चर्चेसाठी पाठवली आहेत.”
“हा शब्द सुचवणं माझा पुढाकार नाही”
“हा शब्द सुचवणं माझा पुढाकार नाही. हा महिला आयोगाचा पुढाकार आहे. त्यांनी चार नावं सुचवली, आणखी काही लोकांनी चार नावं सुचवली. सर्व नावं मी विभागात पाठवले आणि चर्चा करण्यास सांगितले. त्यात काय चुकीचं आहे हे मला समजत नाही,” असंही मत लोढा यांनी व्यक्त केलं.
“महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी पर्यायी शब्द का?”
महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी हा पर्यायी शब्द सुचवण्याचा प्रस्ताव कशासाठी? या प्रश्नावर लोढा म्हणाले, “सरकार महिलांच्या आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करत आहे. या शब्दाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मंत्री म्हणून माझ्याकडे दररोज ५-१० पत्रं असतात. त्यातील जे व्हीआयपी पत्रं आहेत ते आम्ही नेहमीप्रमाणे विभागाकडे पाठवतो. त्यात आक्षेपार्ह काय आहे? ती नावं चर्चेसाठी पाठवली आहेत.”
“तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विचारा की…”
“तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विचारा की, त्यांनी कशासाठी विधवांचं नाव बदलण्यासाठी का सांगत आहेत. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी पर्यायी नाव सुचवलं होतं. हा माझा पुढाकार नाही. रुपाली चाकणकर आणि आणखी काही संघटनांच्या सुचनांचे पत्र मी विभागाकडे पाठवले आहे. याबाबतच्या नावाचा प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर काय करणार हे सांगू,” असंही लोढा यांनी नमूद केलं.