Nitesh Rane On CM Devendra Fadnavis : राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच १७ मार्च रोजी नागपूरमध्ये हिंसाचार झाल्याची घटना घडली. नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानंतर नागपुरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्याही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात करण्यात आलेला आहे.
नागपूरच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वादग्रस्त विधाने टाळण्याची तंबी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी खरंच तंबी दिली का? याबाबत आता खुद्द नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर घटनेच्या संदर्भात विधानसभेत निवेदन सादर केलं आहे. यामध्ये नागपूरच्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, म्हणजे सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आंदोलन करत होते. मग तो विषय मिटला. मात्र, त्यानंतर सायंकाळी काही लोक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि हिंसाचाराची घटना घडली. मात्र, हे सर्व नियोजित होतं असा संशय आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारची हिंसा घडवायची होती का? याची देखील आता चौकशी होणार आहे”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
“नागपूरच्या घटनेत पोलिसांवर हल्ला करण्यात आला, पोलिसांवर हल्ला करण्याचं कारण काय? एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. अशा प्रकारे हल्ले करण्यात आल्यानंतर राज्य सरकार गप्प बसेल असं वाटतं का? आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा अधिकार कोणी दिला?”, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तंबी दिली का?
नितेश राणे यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याची चर्चा आहे, या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी म्हटलं की, “गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मी पाहिलं आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिलं. मत्स्य खात्याचा मंत्री असल्यामुळे माझी निमंत्रण पत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे. तसेच माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्यामधील मी एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या मंत्र्यांची जी यादी आहे, त्या यादीत माझं (नितेश राणे) नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर काय बोलतात? याची चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला नाही”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.