बुलडाण्यातील शेतमजुराची आत्महत्या
* अतिमद्यसेवनाने मृत्यू झाल्याचा दावा
* पोलिसांच्या पंचनाम्यात गळफासाची नोंद
बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या पाच शेतमजुरांपकी दत्ता माघाडे यांच्या मृत्यूबाबत राज्याचे रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत केलेले निवेदन खोटे असल्याचे सिद्ध करणारे पुरावे समोर आले आहेत. माघाडे यांचा मृत्यू अति मद्यसेवनाने झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनीच पोलीस जबाबात म्हटल्याचे राऊत यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र पोलीस पंचनामा व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालात माघाडे यांचा मृत्यू गळफास लावून घेतल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांनी दिशाभूल का केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील टिटवी व गोत्रा या गावच्या शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला ‘लोकसत्ता’ने गेल्या महिन्यात ‘शेतमजुरांच्या जगण्याचा कडेलोट’ या मथळ्याखाली वाचा फोडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. नियम ९३ अन्वये आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेतही या प्रकरणी सूचना उपस्थित केली. त्यावर रोहयोमंत्री राऊत यांनी दिलेले उत्तर वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
माघाडे यांची आत्महत्या टिटवी गावच्या शिवारात ७ जुलला सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात िलबाच्या झाडाला गळफास घेतल्याने झाली. माघाडे यांची पत्नी पारूबाई यांनी दिलेल्या माहितीवरून लोणार पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली. शवविच्छेदनात माघाडे यांचा गळफास घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा स्पष्ट अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्याचा आहे. असे असताना ‘अति मद्यसेवनाने’ हा मृत्यू झाल्याचे राऊत यांनी संबंधित कुटुंबाच्या कोणत्या जबाबाच्या आधारे सांगितले, हे समजलेले नाही.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या प्रल्हाद श्यामजी कोकाटे, चांगुणाबाई गजानन डाखोरे या मजुरांनी टिटवी येथे मग्रारोहयो अंतर्गत काम केले नाही. तसेच अमृता गोरे, महादा सोनाजी राऊत यांनी गोत्रा येथे मग्रारोहयोंतर्गत काम केले नाही, असेही निवेदन राऊत यांनी केले. मुळात या मजुरांनी सिल्लोड (जिल्हा औरंगाबाद) तालुक्यात केलेल्या कामाचे पसे मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती असताना मूळ मुद्दय़ाला बगल देत आत्महत्या केलेल्या मजुरांनी लोणार तालुक्यात काम केले नाही, असा अजब खुलासा राऊत यांच्या निवेदनात आहे.
रोहयोमंत्र्यांकडून विधिमंडळाची दिशाभूल ?
बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या पाच शेतमजुरांपकी दत्ता माघाडे यांच्या मृत्यूबाबत राज्याचे रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत केलेले निवेदन खोटे असल्याचे सिद्ध करणारे पुरावे समोर आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister nitin raut makeing fraud with council