राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिला आंतरराष्ट्रीय सहकार महोत्सव अकोला व वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकताच पार पडला. या बँकेच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय नेते असून अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे डॉ. संतोष कोरपे अध्यक्ष आहेत. बँकेत पक्षविरहित कामकाज चालत असल्याची चर्चा असते. सहकार महोत्सवात मात्र राजकीय फटकेबाजीचे वेगळेच चित्र दिसले. डॉ. कोरपे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली, तर माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, नाफेडची खरेदी, सेवा सोसायट्यांच्या समस्यांवरून सरकारवर टीकेचे सूर काढले. यासर्व मुद्द्यांचा भाजपचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी जोरदार समाचार घेतला. ‘विपणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन), राज्य सरकारी बँक कोणी अडचणीत आणली? तुमच्याच पक्षाचे सहकार नेते तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यांनीच राज्य सहकारी बँक बरखास्त केली. स्व. वसंतराव धोत्रे सहकार राज्यमंत्री तर कापूस एकाधिकार फेडरेशनचे अध्यक्ष स्व. अण्णासाहेब कोरपे असताना त्यांच्या काळात पांढरे फटक कपडे घालणाऱ्यांनीच महासंघ बंद पाडले. कापसाच्या बंडीत नुसते गोटेच भरून नेत होते ना.. हे तुम्हालाही चांगलेच माहीत आहे,’ अशा वऱ्हाडी शब्दांत रणधीर सावरकर यांनी समाचार घेतला. तसेच अध्यत्र डॉ. कोरपे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना ‘हातात तुतारी असली तरी ते कमळाचा सुगंध घेत असतात,’ असा चिमटाही काढला.
वेळ कोणाची चुकली ?
गावच्या जत्रेनिमित्त रविवारी कुंडलमध्ये महाराष्ट्र कुस्ती सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. दिग्गज पैलवानांची लढत निश्चित असल्याने मैदान खचाखच भरले होते. आमदार अरुण लाड यांनी पक्षभेद विसरून राजकीय नेत्यांनाही या कुस्तीसाठी आणि यात्रेच्या मेजवानीसाठी आमंत्रित केले होते. कुस्ती आणि राजकारण याचे अलिखित समीकरण तयार झाले आहे. दोन्ही क्षेत्रांत एकमेकावर डाव-प्रतिडाव टाकावे लागतातच. यात कुणी विजयाची ललकारी देतो, तर पराभूत पुढच्या मैदानात पुन्हा उतरण्याची तयारी करत राहतो. रविवारी कुंडलच्या मैदानावर आजी-माजी खासदार एकत्र आले. विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात आ. विश्वजित कदम, आ. अरुण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या साक्षीने हास्यविनोद रंगलाही. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी घेऊनही संजयकाका पराभूत झाले. मैदानात काका येताच, खासदारांनी माजी खासदारांच्या हातातील घड्याळ निरखत घड्याळ जूनच असले तरी वेळ मात्र चुकली, असे म्हणत मिश्कील टिप्पणी केली आणि कुस्तीच्या फडात हास्याचा धबधबा कोसळला.
(संकलन : प्रबोध देशपांडे, दिगंबर शिंदे)