राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे निवासस्थानापासून दुचाकी चालवत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे अचानक दाखल झाले. अचानक गृहराज्यमंत्री पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी शंभूराज देसाई यांनी उपस्थित पोलिसांची झाडाझडती घेत पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
शंभूराजे देसाई हे दुचाकीवरून पोलीस स्थानकात पोहोचले. मात्र, दुचाकी चालवताना त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. गृहराज्यमंत्री स्वतःच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर सामान्य जनतेचं काय, असा सवाल नागरिक करत आहे. राज्यात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. परंतु गृहराज्यमंत्र्यांनाच नियमांचा विसर पडल्याचं दिसून आलं.
दुसरीकडे, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी उपस्थित पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. पोलीस स्थानकात उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रश्नदेखील विचारले.