भाजपामध्ये मी प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी एकट्याने खिंड लढवू अशी गर्जना केली होती. मात्र, आता त्यांनी खिंड सोडून पळ काढल्याचा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना लगावला. माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपनेते डॉ. अतुल भोसले या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारताच तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले “मेंटल हॉस्पिटल…”
विधिमंडळातील काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर खरेतर हे त्यांनाच विचारायला हवे असे नमूद करून, पण ते भाजपात आलेचतर त्यास आपला विरोध असण्याचे कारण नाही. आणि अशा बाबींमध्ये पक्षनेतृत्वच निर्णय घेतील आणि या निर्णयानुसार आम्ही काम करू असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि दरम्यानच्या घडामोडीबरोबरच काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष विजयी उमेदवार, आमदार सत्यजित तांबे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, विखे-पाटील म्हणाले, की सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली. मतदान केल्यामुळे ते विजयी झालेत. त्यामुळे आमदार तांबे यांनी भाजपमध्येच यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांना स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा असताना निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्याने यातच त्यांच्या राजकीय दिशेचे उत्तर स्पष्ट होत असल्याचे सूचक वक्तव्य विखे-पाटलांनी केले. भाजपाचे लोकसभेच्या सातारा मतदार संघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले हे अत्यंत होतकरू असून, नेतृत्व करण्याची क्षमता असल्याने त्यांनी कराडमधून नेतृत्व करावे. त्यांना भविष्यात मोठे करू असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.