नितीन पखाले, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी नेते संजय देशमुख यांनी आज, गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्याने ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये असलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. दोन संजयमध्ये संघर्ष अधिक तीव्र होईल, अशी चिन्हे आहेत. संजय देशमुख हे बंजारा समाजातील एक गट आणि कुणबी समाजासह इतर समाजांना एकत्र आणून संजय राठोड यांची दिग्रस मतदारसंघातील सद्दी संपवू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी एकही विरोधक शिल्लक ठेवला नाही. मात्र संजय देशमुख यांनी २०१९च्या निवडणुकीत राठोड यांना कडवी झुंज दिली होती. आज शिवबंधन बांधल्यानंतरही देशमुख यांनी राठोड यांना थेट आव्हान दिले. ‘संजय राठोड हे शिवसेनेमुळे निवडून येत होते’, असे देशमुख म्हणाले. दिग्रस विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहे. शिवाय आदिवासी आणि मराठा, कुणबी समाजाची मतेही लक्षणीय आहेत. राठोड हे बंजारा मतांचे ध्रुवीकरण करून निवडून येतात. त्यामुळे भविष्यात संजय देशमुख हे इतर सर्व जातींची मोट बांधून राठोड यांना धक्का देऊ शकतात. बंजारा समाजातील महंत सुनील महाराज हेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याने त्याचा परिणामही राठोड यांच्या मताधिक्यावर होण्याची शक्यता, राजकीय गोटात व्यक्त होत आहे.

सुनील महाराज यांनी आज मातोश्रीवर संजय देशमुख यांच्यासोबत उपस्थित राहून, बंजारा समाजातील एक गट देशमुख यांच्यासोबत असल्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. संजय देशमुख हे १९९९ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख होते. मात्र त्यावेळी त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने ते दिग्रसमधून अपक्ष म्हणून लढले आणि निवडून आले. काँग्रेसला पाठिंबा देऊन राज्यमंत्रीही झाले. १९९९ आणि २००४ मध्ये संजय देशमुख अपक्ष आमदार होते. त्यानंतर काँग्रेस, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच देशमुख यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात आली होती, असे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत देऊन ७५ हजार मतदान घेत राठोड यांना टक्कर दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister sanjay rathore face challenge after former bjp leader sanjay deshmukh join uddhav thackeray camp zws
Show comments