नांदेड: राज्यातील २५  हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली. किनवट येथील समतानगरात आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेला मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आ.बाबूराव कदम कोहळीकर, उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे. किनवटमध्ये १०० मुलांसाठी तर  माहूर व हिमायतनगरमध्ये १०० मुलींसाठी १५ ते २० कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून, येत्या ३ ते ४ महिन्यात या कामाच्या भूमिपुजनाला आपण स्वतः येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किनवटमध्ये सातत्याने चौदा वर्षांपासून धम्म परिषद होते, ही बाब कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांनी काय निर्माण केले, हे पाहायचे, ऐकायचे असेल, तर धम्म परिषदेत आले पाहिजे. समाज जागरुक होत असला, तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे, तर देणारे व्हावे. बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की, त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होवू शकत नाही. समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार भीमराव केराम, आ.बाबूराव कदम, विजय खडसे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. अॅड.सुनील येरेकार यांनी आभार मानले. मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संथागार वृद्धाश्रमास भेट दिली. त्यांच्यासमवेत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader