कराड : राज्य शासनाच्या तिजोरीतून ७० हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले. पण, एक टक्काही जलसिंचन झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना याबाबतची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कामे प्रलंबित राहत असून, फाईल्सचा निपटारा होत नसल्याच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना, मंत्री देसाई यांनी हे जुने उदाहरण देत मुख्यमंत्र्यांकडून फाईल्स तपासूनच निर्णय घेतले जात आहेत आणि आमच्या युती सरकारचे निर्णय, त्यांची अंमलबजावणी पाहता राज्यात गतिमान सरकार कार्यरत असल्याचा दावा मंत्री देसाई यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी आपल्या गावी आले असतानाही त्यांनी ६२ फाईल निकाली काढल्याचे ते म्हणाले.
शिवसेना हा भाजपसोबतच्या युतीतला मित्रपक्ष असून कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावल्याने ते तिथे गेले. पण कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोण ओळखते म्हणून ते तिथे गेलेत असे म्हणणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांना कर्नाटकात प्रचारासाठी कोणी बोलवले नसल्याने निराशेपोटी त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी खिल्ली अजित पवारांचा नामोल्लेख टाळत मंत्री देसाई यांनी केली.
आमदार अपात्रतेबाबत न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयासंदर्भात बोलताना मंत्री देसाई म्हणाले की, आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले आहे. अपात्रतेबाबत आम्हाला कोणतीही चिंता नाही. तसेच नियमाने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे. त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे महाराष्ट्रात प्राबल्य असून, आगामी विधानसभा निवडणुकीत शंभर जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच युतीच्या जागा वाटपाचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेतृत्वच घेईल असे मंत्री देसाई यांनी सांगितले.