कराड : एकनाथ शिंदेसह आम्ही बाजूला गेल्यापासून उद्धव ठाकरेंच्या जवळ संजय राऊतच आहेत आणि सवयीचा परिणाम जसा आपण म्हणतो तसे राऊत जी भाषा बोलतात, जे शब्द वापरतात तेच उद्धव ठाकरेंच्या कानावर पडत असल्याने त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात कोणालाही न पटणारा शब्दप्रयोग झाला. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणारच अशा शब्दात राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या अनुषंगाने मृत्यू पावणाऱ्यांसाठी ‘देवेंद्रवासी’ असा तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना सैतान असा केलेला शब्दप्रयोग यावर टीका होत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कलंकीत या शब्दप्रयोगामुळे नवा वाद उद्भवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई माध्यमांशी बोलत होते.
देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरेंची यापूर्वीच्या भाषणात संयम आणि शांत वक्तव्यं असायची. परंतु, आता आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका स्वीकारली. तेव्हापासून तसेच गेल्या एकदोन महिन्यात उद्धव ठाकरेंच्या व्यक्तव्यांमध्ये एक वेगळेपणा दिसतोय. आम्ही मंडळी बाजूला गेल्यापासून संजय राऊतच ठाकरेंच्या जवळ असल्याने जसा सवयीचा परिणाम म्हणतो तसे राऊत जी भाषा बोलतात शब्द वापरतात तेच सतत उद्धव ठाकरेंच्या कानावर पडत असल्याने देवेंद्र फडणवीसांबद्द्ल तसा शब्द वापरला गेला असेल. पण तो कोणालाच रुचलेला नाही. फडणवीसांचे लाखो चाहते आहेत. आमच्यासारखे त्यांचे सहकार्य आहेत. जे अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत आहेत. अशा उत्कृष्ट संसदपट्टू, अनुभवी नेतृत्वाबाबत कलंकित हा शब्द उद्धव ठाकरेंकडून होणे हे महाराष्ट्राला रुचलेले नाही. त्यामुळे यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणारच असा इशारा शंभूराजेंनी दिला. या वक्तव्याविरुध्द लोकभावना व्यक्त होत असून, निषेध व्हायला लागला असल्याने उद्धव ठाकरेंसारख्या नेत्यांनी इथून पुढे तरी असे बोलणे टाळले पाहिजे अशी अपेक्षाही मंत्री शंभूराजेंनी व्यक्त केली.